• दोघांना अटक : सायबर क्राईम पोलिसांची कारवाई

बेळगाव : बेळगावमधील एका प्रसिद्ध उद्योजकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, सायबर क्राईम पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हैदराबाद येथील श्रीपाद नाईक आणि शरद नाईक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून उद्योजकाला भीती दाखवली आणि त्यांच्या बँक खात्यातील कोट्यवधी रुपये देशातील सहा राज्यांतील १० वेगवेगळ्या मुख्य खात्यांमध्ये वळवले.

तपासात समोर आले की, लुटलेली रक्कम सुमारे ३९० उप-खात्यांद्वारे फिरवण्यात आली. एका बनावट कंपनीच्या खात्यात २ कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी १ कोटी रुपये पोलिसांनी तात्काळ गोठवले आहेत.

हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या शहरांतील बँक खात्यांचा या मोठ्या फसवणुकीसाठी वापर करण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते.

या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.