- ई-मेलमुळे खळबळ ; सुरक्षा यंत्रणा सतर्क
हुबळी : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे पाठवलेल्या या धमकीनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
न्यायालयाच्या प्रशासनाला प्राप्त झालेल्या ई-मेलची माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाकडून संपूर्ण न्यायालयीन संकुलाची कसून तपासणी करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गरग पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक नाकेबंदी केली असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी केली जात आहे.
न्यायालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे न्यायालयाला लक्ष्य करत धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, न्यायालय परिसरात संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या धमकीमागील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.








