• चोरीच्या सात दुचाकी जप्त

धारवाड : धारवाड शहर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

शिवानंद माने (रा. कमलापूर, धारवाड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. धारवाड शहर पोलीस स्थानकात दुचाकी चोरीच्या तक्रारी नोंदवल्यानंतर, पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला.

सखोल चौकशीदरम्यान आरोपीने विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून २,३५,००० रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करून कारागृहात रवानगी दिली गेली. याप्रकरणी धारवाड शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.