- ग्रामीण पोलिसांत एफआयआर
- पिरणवाडीत चिथावणीखोर हावभाव व भाषणाचा आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात आयोजित हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील हिंदू कार्यकर्त्या हर्षिता ठाकूर यांच्यासह अन्य सहा जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल बेळगाव शहर व परिसरात आठ ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनानिमित्त विविध भागांत शोभायात्रा काढण्यात आल्या. याच दरम्यान, बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी परिसरात चिथावणीखोर हावभाव आणि चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप पुढे आला आहे.
अब्दुल खादर मुजावर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मच्छे गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हर्षिता ठाकूर यांनी अन्सारी दर्ग्याच्या दिशेने बाण सोडण्यासारखे हावभाव करत एका विशिष्ट धर्मीय समाजाच्या भावना दुखावल्या. तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल, अशा प्रकारची भडकाऊ वक्तव्ये केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. समाजात सलोखा आणि शांतता अबाधित राहावी यासाठी या घटनेची गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.








