• बेळगावकरांनी पाहिले वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण
  • अवघी १५ – २० मिनिटे अनुभवला दुर्मीळ नजारा

बेळगाव : ढगांच्या आडून डोकावणारा गडद तांबूस चंद्र आणि अवघ्या काही मिनिटांची संधी,अशा वातावरणात बेळगावकरांनी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण अनुभवले. सायंकाळच्या ढगाळ हवामानातही नागरिकांनी ‘ब्लड मून’चा क्षणिक नजारा पाहत खगोलप्रेमाची उत्सुकता जपली.

यावेळी झालेले ग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण होते. पृथ्वीची सावली पूर्णपणे चंद्रावर पडल्यावर तो काळा न दिसता गडद लाल किंवा तांबूस रंगाचा भासतो. या दृश्याला वैज्ञानिक भाषेत ‘ब्लड मून’ असे म्हटले जाते. पृथ्वीच्या वातावरणातून अपवर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांमुळे चंद्राला हा रक्तवर्ण प्राप्त होतो.

भारतीय प्रमाणवेळेनुसार ग्रहण दुपारी ३.२० वाजता सुरू झाले; मात्र त्या वेळी चंद्र भारतात दिसत नव्हता. चंद्रोदय सायंकाळी सुमारे ६.२६ वाजता झाल्यानंतर ग्रहणाचा अंतिम टप्पा दृश्यमान झाला. सुमारे ६.४६ ते ६.४७ दरम्यान ग्रहण समाप्त झाले. त्यामुळे भारतात केवळ १५ ते २० मिनिटेच हा दुर्मीळ नजारा पाहता आला.

सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. तरीही सायंकाळी आकाशात क्षणाक्षणाला बदलणाऱ्या ढगांच्या आडून लालसर छटा असलेला चंद्र दिसताच नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यांत तो क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. खगोलप्रेमींसाठी ही एक संस्मरणीय पर्वणी ठरली.

एकंदरीत अल्पकाळासाठीच का होईना, ‘ब्लड मून’चा अनुभव घेणारे बेळगावकर वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचे साक्षीदार ठरले.