• ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा विश्वास

बेळगाव : शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञानच देत नसून, भावी पिढी आणि देशाचे भवितव्य घडविण्याचे काम करत असतात असे प्रतिपादन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी बोलताना केले.

आज शुक्रवारी सायंकाळी कॅम्प येथील बी.के मॉडल हायस्कूलच्या शताब्दी समारोहाच्या समारोप समारंभाराला, मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक नागथीहळी चंद्रशेखर तसेच बेळगावच्या जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ब्रिगेडियर मुखर्जी म्हणाले, चांगल्या शिक्षणातून आजचे विद्यार्थी उद्या देशाचे सुजाण नागरिक बनणार आहेत. यांना घडविताना शिक्षकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी. आजच्या जगात युद्धनीती ही बदलली आहे. याचा प्रत्यय आपणाला ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहायला मिळाला. आज जगभरात युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. याचा विचार केल्यास शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चांगली ओळख करून द्यावी. आजच्या युगात सायन्स टेक्नॉलॉजी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागथीहळी चंद्रशेखर म्हणाले ,अनेक कार्यक्रमात भाग घेत असतो. मात्र बेळगावात आल्यानंतर एक वेगळेच समाधान आणि आनंद मिळतो .आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, संचालक यांच्यामधील उत्साह पाहून प्रभावित झालो आहे. शाळेने १०० वर्षे पूर्ण केल्याचा मलाही निश्चित अभिमान आहे. मी स्वतःही ज्या सरकारी शाळेत शिकलो त्या शाळेचा या यावर्षी शतक महोत्सव साजरा होत आहे. हा एक योगायोग आहे .असे सांगतानाच त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आणि सिनेसृष्टीतील अनुभव सांगितले. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनीही यावेळी समयोचीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्रीनिवास शिवणगी यांनी आभार मानले.आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.