• कोल्हापूर येथे सर्वपक्षीय शोकसभेत दीपक दळवींना श्रद्धांजली

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्या निधनामुळे सीमा आंदोलनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आंदोलन अधिक जोमाने पुढे नेणे आवश्यक असून, कोल्हापुरातून ही चळवळ नव्याने बळकट करण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा असल्याचे मत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथील निधनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना देवणे म्हणाले, “ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सीमा लढ्यात दळवी सुरुवातीपासून सक्रिय होते. आंदोलने-मोर्चांमध्ये सहभागी होणे गंभीर गुन्ह्यांचा धोका असतानाही दळवी यांनी सातत्याने अन्यायाविरोधात आवाज उठवला.”

मराठा महासंघाचे नेते वसंत मुळीक यांनी सांगितले, “सीमा प्रश्नासाठी दळवी यांनी संपूर्ण आयुष्य खर्चले. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ ही त्यांची भूमिका होती. सलग ७० वर्षे सुरू असलेला हा लढा जगात अनोखा असून, सीमा भागातील अनेक गावे या चळवळीत सहभागी झाली आहेत.”

दिलीप पोवार यांनी राज्य सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देणे हीच दळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. व्यंक्काप्पा भोसले यांनी दळवी हे सर्व मराठी भाषिकांचे ठाम आवाज होते, तर महेश मछले यांनी सीमा लढ्याच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल असे नमूद केले.

यावेळी शाहीर दिलीप सावंत, रिपब्लिकन पक्षाचे भाऊसाहेब काळे, विठ्ठल कोतेकर, प्रा. मधुकर पाटील, प्रभाकर शिंदे यांनी मनोगते व्यक्त केले. तसेच वाय. ए. पाटील, पी. एन. हिरगुडे, तय्यब मोमीन, संपत्ती पाटील, रोहिणी मुळीक, पद्मजा पाटील, महेश जाधव, बबनराव शिंदे, आकाश शेलार, गोपाळ पाटील व अवधूत पाटील उपस्थित होते.