बेळगाव / प्रतिनिधी

भूतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात काळवीटांच्या मृत्यूची मालिका सुरूच असून, आज सकाळी पुन्हा एका काळवीटाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृत कळविटांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, प्राणी संग्रहालयात एकूण ३८ काळवीट होती. मात्र सलग मृत्यू होत राहिल्याने आता फक्त ७ काळवीट जिवंत असून, त्यांना विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संबंधित प्राण्यांवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

कळविटांच्या मृत्यूमागे संसर्गाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात विशेष पशुवैद्यकीय पथकाने तपासणी केली असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

काळविटांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या वेगाने मृत्यू होत आहेत, त्यावरून संरक्षण आणि उपचार पद्धतीत त्रुटी राहिल्याचा संशय नागरिक आणि पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. प्राणीसंग्रहालय परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण, जलस्रोत स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे, प्राण्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेष औषधोपचार,आजारी प्राण्यांचे स्वतंत्र देखरेख केंद्रात विलगीकरण, परिसरातील पाणी आणि खाद्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची मागणीही जोर धरत आहे.

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालय हे प्रमुख पर्यटनस्थळ असल्यामुळे, ही घटना केवळ वन्यजीव संरक्षणापुरती मर्यादित न राहता याचा पर्यटनालाही फटका बसण्याची शक्यता आहे.  दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देत असतात. अशावेळी सलग मृत्यू होणे हा चिंतेचा विषय बनला आहे.