- आमदार रमेश जारकीहोळी
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यात दलित आमदारांविरोधात सातत्याने अन्याय होत असून त्यांना राजकीयरीत्या अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला. या पार्श्वभूमीवर पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येत ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
बेळगाव येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून दलित लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले. आमदार चंद्रू लामाणी प्रकरणाचा उल्लेख करत त्यांच्या समाजातील काही व्यक्ती आणि स्वामीजींकडून कट रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जर लामाणी दोषी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; मात्र चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धारवाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुरेश यांच्यावर निवृत्तीच्या दिवशीच करण्यात आलेली कारवाई खेदजनक असल्याची टीकाही त्यांनी केली. आम्हालाही दडपण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र संघर्षातून आम्ही बाहेर पडलो, असे ते म्हणाले.
राज्य सरकारवर निशाणा साधत त्यांनी लुटीचे आरोप केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे पूर्वीसारखी प्रशासकीय पकड राहिलेली नाही आणि ते आता विशिष्ट समाजापुरते मर्यादित नेते ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. २०१३-१४ मधील नेतृत्व आणि सध्याची परिस्थिती यामध्ये मोठा फरक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बनावट जात प्रमाणपत्रांच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत २०२८ मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यास कठोर निर्णय घेतले जातील, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये पुनरागमनाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना केवळ पोस्टर लावून किंवा माध्यमांमध्ये बोलून कोणी मुख्यमंत्री होत नाही; त्यासाठी अनुकूल राजकीय वातावरण आवश्यक असते, असे ते म्हणाले.
भाजपला सध्या कोणालाही पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेले नाही, असे स्पष्ट करत बेळगावपासून बीदरपर्यंत संघटन मजबूत केल्यास २०२८ च्या निवडणुकीत भाजप १२० जागांसह सत्तेत येईल, असा विश्वास रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.








