बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी भक्तीभावाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घेतला. स्वत:च श्रीमूर्ती नेऊन त्यांनी प्रतिष्ठापनाही केली. याचवेळी जिल्ह्यातील प्रत्येकाने बंधुभावाने व सलोख्याने रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशभक्तांची कौतुकाची थाप मिळविली होती. बुधवारी गणेशचतुर्थी कार्यक्रमात त्यांनी सहकुटुंब भाग घेतला.

  • बंगल्यावरही प्रतिष्ठापना : 

राणी चन्नम्मा चौक परिसरातील गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीचे पूजन करून जिल्हाधिकाऱ्यांनी कारमधून श्रीमूर्ती आपल्या कार्यालयात नेली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे आईवडील व मुलगाही होता. कार्यालयात श्रीमूर्तीची विधिवत प्रतिष्ठा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्यावरही प्रतिष्ठापनेसाठी श्रीमूर्ती नेली.