• क्लब रोड परिसरात थरार ; पैशांच्या व्यवहारातून हल्ल्याचा संशय

बेळगाव / प्रतिनिधी

राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र आणि काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या वाहनचालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना बेळगाव शहरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

बेळगुंदी येथील रहिवासी असलेले बसवंत कडोलकर (वय ३२) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बसवंत यांच्यावर चार ते पाच वेळा चाकूने वार करून घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना शहरातील क्लब रोड परिसरात घडली.

प्राथमिक तपासात हा हल्ला पैशांच्या व्यवहारातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, हल्लेखोर हे जखमी बसवंत यांच्या ओळखीचेच असावेत, अशी माहिती पुढे येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमी बसवंत यांना तातडीने बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृणाल हेब्बाळकर यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.