बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील काँग्रेस रोडवर आज दुपारी ट्रक आणि ऍक्सेस दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बैलहोंगल तालुक्यातील सोमनट्टी येथील ३० वर्षीय तरुण मुत्तय्या शंकरय्या यलगुप्पीमठ असे मृत तरुणाचे नाव आहे. तिसऱ्या रेल्वे गेटकडून पहिल्या रेल्वे गेटकडे जात असताना हा अपघात घडला.

पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स आणि अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने रस्त्यावरील वाहतूक नियोजनाच्या मुद्द्यावरून प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. या घटनेमुळे काँग्रेस रोडवर काही तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस आणि पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.








