• महापालिकेतील निर्णयाला विरोध

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा ताळिकोटे यांच्या बदलीसंदर्भातील निर्णयावर काँग्रेस नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सभेत भाजपने ठराव मंजूर करून त्यांच्या बदलीची शिफारस केली असली, तरी हा निर्णय कोणत्या निकषावर घेण्यात आला, याबाबत काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

काँग्रेस नगरसेवकांच्या प्रतिनिधीमंडळाने या संदर्भात महापालिका आयुक्त शुभा बी. यांना निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले की,“उपायुक्तांविरोधातील ठराव हा एका मताच्या फरकाने मंजूर झाला आहे. याबाबत शासनस्तरावर चौकशी होऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. आमच्या स्तरावर तात्काळ कारवाई शक्य नाही.”

यापूर्वी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी या विषयावर आंदोलन केले होते. त्यांना ठरावाची प्रत देण्यात येणार असून, त्यानंतर नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘खाऊकट्टा’ प्रकरणाबाबत विचारले असता आयुक्त म्हणाल्या की,“महापालिकेचे वकील न्यायालयात हजर राहत आहेत आणि संस्थेची बाजू मांडत आहेत. या प्रकरणात अधिकारी आपापली जबाबदारी नीट पार पाडतील अशी अपेक्षा आहे.” शासनाच्या चौकशीनंतरच सत्य परिस्थिती समोर येईल, असे आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले.