- बेळगाव स्टेडियम केंद्रस्थानी : केएससीए अध्यक्ष वेंकटेश प्रसाद
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी राज्यातील क्रिकेट पायाभूत सुविधांच्या जलद उन्नतीचे आश्वासन दिले आहे. “राजकारण दूर ठेवून, राज्यातील क्रिकेट उच्चस्तरावर नेणे हेच आमचे उद्दिष्ट,” असे ते म्हणाले.
बुधवारी बेळगाव कणबर्गी येथील केएससीए स्टेडियममध्ये पत्रकार परिषदेत वेंकटेश प्रसाद यांनी सांगितले की, मैदानाची गुणवत्ता योग्य असली तरी स्टेडियममध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा तातडीने आवश्यक आहेत.
“तीन वर्षांपासून येथे विकासकामे अजिबात पुढे सरकलेली नाहीत. अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांनी सुरु केलेली कामे अपूर्ण आहेत. आम्ही त्वरित सुधारणा करून स्टेडियमचा सर्वांगिण विकास करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएल २०२५ विजयोत्सवातील दुःखद घटनेबाबत राज्य सरकार आणि बीसीसीआय पूर्ण सहकार्य करत आहेत. या घटनेमुळे काही महत्त्वाचे सामने रद्द झाले असले तरी, बीसीसीआय ने भरपाई म्हणून द्विपक्षीय मालिका आणि आयपीएलच्या सुरुवातीचे सामने देण्याचे आश्वासन दिले आहे.
नव्या समितीने पदभार स्वीकारताच राज्यभरातील क्रिकेट केंद्रांची पाहणी सुरू केली असून, बेळगाव, हुबळी, शिमोगा, तुमकुर यांसह सर्व केंद्रांमध्ये जलद गतीने सुधारणा करण्याचे नियोजन आहे.
“बेळगाव हे आमच्या प्राथमिकतेतील केंद्र आहे. येथे नियमितपणे दर्जेदार सामने आयोजित केले जातील, ज्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना मोठी संधी मिळेल,” असे प्रसाद म्हणाले.
पत्रपरिषदेत केएससीएचे धारवाड विभागाचे संयोजक अविनाश पोतदार, उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर, सचिव संतोष मेननावर आणि विनय मृत्युंजय उपस्थित होते.







