- महापालिकेच्या महसूल विभागाची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
नागरिकांना चुकीची माहिती देऊन महापालिकेची बदनामी करू नये, तसेच त्यांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढावा, असे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले. महसूल विभागातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. २६ मे रोजी आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीच्या कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सदस्यांनी कर संकलन आणि चलन भरणा करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही नगरसेवकांनी कार्यालयात गेल्यानंतरही त्यांच्याशी योग्य वर्तन केले जात नसल्याची तक्रार केली.
यावर महापौर मंगेश पवार यांनी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगितले. यामुळे महापालिकेची प्रतिमा खराब होत असल्याचे ते म्हणाले. कर्मचाऱ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी ते आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात असेही महापौरांनी सांगितले.
नगरसेवक नितीन जाधव यांनी एका खाजगी शाळेच्या मालमत्ता करात सुमारे चार टक्के वाढ केल्याचे निदर्शनास आणून दिले. कर्मचाऱ्यांकडून ती वाढ कमी करण्यासाठी टाळाटाळ केली जात असून, मुख्यालयाकडे बोट दाखवले जात आहे. या गोंधळामुळे दोन वर्षांचा कर थकीत आहे. असेच सुरू राहिल्यास महापालिकेची प्रतिमा खराब होईल आणि तिजोरीवरही परिणाम होईल, असे जाधव म्हणाले. यावर महापौरांनी कर संकलनासाठी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना योग्य माहिती देण्याचे निर्देश दिले.
बैठकीत लीज सह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच महापालिकेच्या भू भाड्याचे चलन क्यूआर कोडद्वारे देण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी आणि विरोधी पक्षनेते मुजम्मिल ढोणी उपस्थित होते.








