बेळगाव / प्रतिनिधी
संपूर्ण जगभरात भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा नाताळ अर्थात ख्रिसमस म्हणून मोठ्या भव्य दिव्य आणि उत्साहात साजरा केला जात असतो. गुरुवारी नाताळ सणाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील ख्रिस्ती बांधवांच्या चर्च प्रार्थना स्थळांमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभा संपन्न झाल्या. बेळगाव शहर उपनगरात असलेल्या चर्चमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या प्रार्थनेला ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
मध्यरात्री भगवान येशुंचा जन्मदिवस सामुदायिक प्रार्थनेसह साजरा करण्यात येतो. फातिमा कॅथरल चर्च, सेंट मेरी चर्च, तसेच शहापूर येथील चर्चमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आले होत्या. बेळगाव येथील कॅम्प परिसरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण कॅम्प परिसर विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झगमगून गेला. ख्रिश्चन बांधवांचा नाताळ हा प्रमुख सण आहे. नाताळ सणाला चर्च आणि निवासस्थाने सजवण्याची परंपरा आहे.तसेच ख्रिसमस ट्री आणून त्याला स्टार्स फुगे बेल्स इत्यादी वस्तूंनी सजविले जात असतात. याचाच प्रत्येक गुरुवारी ख्रिस्ती बांधवांच्या घरांमधून तसेच चर्च मध्ये नाताळ निमित्त भगवान येशूंच्या जन्माचे देखावे ही सादर करण्यात आले आहेत. गरिबांना वाचवा या थीमनुसार बेळगाव शहरात नाताळ उत्साहात साजरा करण्यात येत आहे २४ रोजी मध्यरात्री दोन तास प्रार्थना करण्यात आली.
आता १ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा गरिबांना वाचवा या थीमवर बेळगाव सह पाच जिल्ह्यातून तीन ते चार हजार ख्रिस्त बांधव नाताळ साजरा करण्यासाठी शहरात आले आहेत, अशी माहिती बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिली. ते म्हणाले, यंदा बेळगावसह धारवाड, गदग, बागलकोट, हावेरी येथील ख्रिस्त बांधव नाताळ साजरा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. नाताळ हा गरिबांचा सण असून आनंदी राहा असा संदेश देण्यात येणार आहे. नाताळ हा गरिबांसाठी, गरिबांचा व गरिबांसोबत साजरा होणारा सण आहे.
नाताळ दरम्यान मध्यरात्री होणारी प्रार्थना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. यादरम्यान सर्व ख्रिस्त बांधव एकत्र येऊन येशू ख्रिस्तांचे प्रार्थना करतात. असे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर ते एक जानेवारी अखेर विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात येणार असून,लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्व ख्रिस्त बांधव यामध्ये सहभागी झाले होते.








