बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक – गोवा प्रवासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चोर्ला – बेळगाव – गोवा मार्गावर अखेर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) या रस्त्याच्या नूतनीकरणाची प्राथमिक कामे सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मलप्रभा नदीवरील कुसमळी येथे काही वर्षांपासून अर्धवट राहिलेल्या पुलाच्या उभारणीलाही आता वेग देण्यात आला आहे. पुलाजवळ वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची आखणी करून त्यावर वाहतूक वळवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेळगाव – चोर्ला – गोवा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे धोकादायक होत होते. या पार्श्वभूमीवर लवकरच संपूर्ण रस्त्याच्या पुनर्बांधणीला गती दिली जाईल, असे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी अभियंता राजेंद्र यांनी सांगितले की, पुलाचे बांधकाम तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे एकाच वेळी वेगाने पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कामांची सतत पाहणी करण्यात येत असून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांनी सुरू झालेल्या नूतनीकरणाच्या कामांचे स्वागत केले आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.








