• बेळगाव पोलिसांच्या प्रॉपर्टी परेडद्वारे चोरीच्या मालाचे वितरण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील विविध पोलीस स्थानकांमध्ये चोरीच्या गुन्ह्यांत जप्त केलेला सुमारे ६ कोटी ३६ लाख ९३ हजार ७४३ रुपये किमतीचा मुद्देमाल ‘प्रॉपर्टी परेड’द्वारे मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आला, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची लहर पसरली.

हा मुद्देमाल २०२५ मध्ये शहरातील घरफोडी, साखळी चोरी आणि वाहन चोरीसंबंधी गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आला होता. त्यात २ कोटी ३६ लाख रुपये किमतीचे सुमारे २ किलो ३३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ कोटी रुपये किमतीची ८५ वाहने, ज्यात जड ट्रक आणि कारचा समावेश आहे, तसेच सीआयआर पोर्टलच्या माध्यमातून शोधलेले १४० मोबाईलही होते. पोलीस दलाने तांत्रिक तपासाद्वारे चोरांच्या मुसक्या उघडत हा सर्व मुद्देमाल जप्त केला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना परत दिला.

यावेळी शांतीनगर येथील डॉ. एम. ए. मरळी यांनी चोरीला गेलेले ११५ ग्रॅम सोने व दुचाकी परत मिळाल्याबद्दल पोलीसांचे आभार मानले, तर वैभव नगरमधील गणेश मंदिराचे पुजारी सिद्धलिंगय्या हिरेमठ आणि सुळेभावी येथील गीता दुधगी यांनीही चोरीला गेलेले साहित्य परत मिळाल्याबद्दल पोलीस दलावरील कृतज्ञता व्यक्त केली. शहापूर, खडेबाजार, टिळकवाडी आणि इतर ठाण्यांतील तपास पथकांच्या मेहनतीचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले असून, नागरिकांना भविष्यातही पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.