बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधील नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण होत असून, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या नवीन बसस्थानकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते आज उद्घाटन करण्यात आले. हे बसस्थानक बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आले आहे.

सुमारे २.१९ गुंठे क्षेत्रफळावर ४९.८ कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या या बसस्थानकात एकूण २८ फलाट आहेत. हे अत्याधुनिक हाय-टेक बसस्थानक असून, यात सरकते जिने, लिफ्ट, सुसज्ज व्यावसायिक संकुल, स्वच्छतागृहे, बेसमेंट, तीन मजले तसेच विभागीय कार्यालयांचा समावेश आहे.

- बसस्थानकातील फलाट क्रमांकानुसार बस मार्गांचा विभाग पुढीलप्रमाणे आहे :
- फलाट १ : वडगाव आणि अनगोळकडे जाणाऱ्या शहर बससाठी
- फलाट २ : उद्यमबाग
- फलाट ३ : ए.पी.एम.सी.
- फलाट ४ : वंटमूरी, रामतीर्थनगर, कणबर्गी
- फलाट ५ : सुवर्णसौध
- फलाट ६ : सुळेभावी, करडीगुद्दी, मारीहाळ जवळ जाणाऱ्या बससाठी
विभागीय नियंत्रणाधिकारी के. एल. गुडन्नवर यांनी नागरिकांना आवाहन केले की, या अत्याधुनिक बसस्थानकाची स्वच्छता राखावी आणि येथील सेवा योग्य पद्धतीने वापरावी.
उद्घाटन सोहळ्यास बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, मंत्री शरण प्रकाश पाटील, एम. सी. सुधाकर यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.