बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते शनिवारी झाले.

या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील गृह वैद्यकीय अधिकारी वस्तीगृहाची कोनशिला, स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन सिटी बस स्थानकाचे उद्घाटन तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठातील नव्या इमारत प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले.
यावेळी बेळगाव जिल्हापालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी “बेळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने हा प्रकल्प साकार झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने येथे लवकरच कर्करोग रुग्णालय देखील सुरू करण्यात येईल.
महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काँग्रेस सरकारचे धोरण आहे, आणि बेळगावमधील हे रुग्णालय त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.”
वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील म्हणाले, “खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे सरकारने कमी खर्चात उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले आहे. हे रुग्णालय कोणत्याही खासगी संस्थेकडे दिलेले नाही. केएलई रुग्णालयातील डॉक्टर सध्या येथे मोफत सेवा देत आहेत, त्यांचे मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी आभार मानले. तसेच सर्व रिक्त पदे लवकरच भरली जातील असे सांगितले.
उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री रामलिंगा रेड्डी, उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर, आमदार राजू कागे, महांतेंश कौजलगी, बाबासाहेब पाटील, महेंद्र तम्मण्णावर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, नागराज यादव आणि के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.