- चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर यंदा वेळापत्रकात बदल
बेळगाव / प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे चव्हाट गल्लीमध्ये होळी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा आयोजकांनी जाहीर केली आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.
रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजता रथ (गाडा) रंगविण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच होळीसाठी लागणारे साहित्य काढून ते रथावर ठेवून रथ श्री चवाटा मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे.
सोमवार, दि. २ मार्च रोजी होळी आणण्यासाठी चव्हाट गल्लीतील भक्त व बैलजोडीधारकांनी दुपारी ३ वाजता किल्ला परिसरात एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याच दिवशी मध्यरात्री १२ वाजता सर्वांनी श्री चवाटा मंदिराजवळ जमून होळी उभी करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रहणवेध सुरू होण्यापूर्वी अग्नी देणे शक्य होईल.
मंगळवार, दि. ३ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत होळी प्रज्वलित करण्यात येईल. त्यानंतर इच्छुक भक्तांना लोटांगण घालण्याची संधी मिळणार आहे. चंद्रग्रहणाचे वेध सकाळी ११.३० वाजता सुरू होणार असल्याने वेळेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ८ वाजता गहाणा घालण्याचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर नवसाचा नारळ ठरविलेल्या जागेवरून अर्पण करण्यात येईल. अंधारात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
श्री चवाटा हे चव्हाट गल्लीतील जागृत देवस्थान मानले जाते. उत्सव सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पंचमंडळी, श्री चव्हाटा युवक मंडळ तसेच समस्त युवक मंडळांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.








