• आरोपी पतीला अटक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, गोवनकोप्प येथील रहिवासी बसवराज गिरेप्पा जोडाळ्ळी याने पत्नी शिवक्का हिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दांपत्याचा प्रेमविवाह झाला असून त्यांना तीन मुले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून शिवक्का दोन मुलांसह माहेरी राहत होती. आरोपीने तिला यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार दोडवाड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.

शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी माहेरी जाऊन शिवक्काला शिवीगाळ करत घराबाहेर ओढून आणले. त्यानंतर भररस्त्यात तिच्यावर हल्ला करून मोठा दगड डोक्यावर व पायावर मारत तिची जागीच हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेनंतर दोडवाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पथकाचे कौतुक होत आहे.