बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या कन्नड ध्वजावरून निर्माण झालेल्या वादाच्या प्रकरणात, कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.

२१ जानेवारी २०२१ रोजी, बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर कन्नड समर्थक संघटनांनी कन्नड ध्वज उभारला होता. या ध्वजावर हरकत घेत महाराष्ट्रातील काही कार्यकर्त्यांनी तो हटविण्याची धमकी दिली आणि कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकविला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दुपारी दोनच्या सुमारास, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील गटाने घोषणाबाजी करत भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप आहे. नंतर या घटनेचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले, ज्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिक समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या प्रकरणात विजय देवणे, संग्रामसिंग कुपेकर देसाई, सुनील शिंत्रे, अमृत जत्ती आणि संतोष मळवीकर या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

शनिवारी बेळगाव न्यायालयात सुनावणीदरम्यान, आरोपींचे वकील शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचनावर यांनी बाजू मांडली. यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, तसेच शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर उपस्थित होते.