• येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेतर्फे अभिनंदनपर सत्कार

येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील माजी विद्यार्थी कु. चंदन कुमार खेमणाकर यांची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल शनिवारी (दि. १० जानेवारी २०२५) शाळेच्या वतीने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा शाळेच्या आवारात एस.डी.एम.सी., मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या संदिप कुंडेकर होत्या. यावेळी एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी आपल्या मनोगतातून कु. चंदन तसेच त्यांच्या वडिलांचे विशेष कौतुक केले. पहिली ते दहावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण करूनही चंदनने भारतीय नौदलात अधिकारीपद मिळवले, हे गावातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी कु. चंदन खेमणाकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते, असा संदेश दिला. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहशिक्षक सातेरी पाखरे यांनी केले. यावेळी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, एस.डी.एम.सी. सदस्य मारुती यळगुकर, चांगदेव मुरकुटे, मुर्तीकुमार माने, शशिकांत पाटील, तसेच सदस्या सौ. अलका कुंडेकर, सौ. प्रियांका सांबरेकर, सौ. रेश्मा काकतकर, श्रीमती शुभांगी मुतगेकर, सौ. अर्चना देसाई, सौ. ज्योती पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.