चलवेनहट्टी : येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बुधवारी, १ एप्रिल २०२६ रोजी मंदिर परिसरात जागरणाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्त रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
त्यानंतर गुरुवारी, २ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या वेळी बाल हनुमानाची प्रतिमा पाळण्यात ठेवून नामकरण विधी पार पाडला जाईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
सायंकाळी ४ वाजता हनुमान जयंतीनिमित्त बैलगाड्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानाशी संबंधित सासनकाठ्यांचे (चांगभले) पूजन करण्यात येईल.
या पूजनानंतर उपस्थित भाविकांना आंबिल व घुगऱ्यांचा प्रसाद वितरित केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.








