- सुदैवाने जीवितहानी टळली ; सांबरा मार्गावरील घटना
सांबरा / वार्ताहर
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुसाट वेगाने रस्त्यानजीक असलेल्या शेतात जाऊन उलटली. मंगळवारी मध्यरात्री सांबरा मार्गावर ही घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कारमधील युवक बचावले.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सांबरा येथील काही युवक धाब्यावर जेवण करून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केए २२ एमसी २४९५ क्रमांकाच्या कारने माघारी परतत होते. रात्रीच्या वेळी मार्गावर मोजकीच रहदारी असल्यामुळे कार भरधाव वेगाने निघाली होती.
तथापि सांबरा येथील ब्रिज ओलांडून जात असताना वळणावर वेगात असलेल्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याशेजारील शेतात जाऊन पलटी झाली. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीनुसार सुदैवाने या अपघातात कारमधील युवकांना किरकोळ दुखापती होण्यापलीकडे काही झाले नाही.
सांबरा येथील ब्रिज जवळील धोकादायक वळणावर यापूर्वीही बरेच अपघात घडले आहेत. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित धोकादायक वळणावर अपघात टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.