बेळगाव / प्रतिनिधी

चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने बेळगावमधून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणाऱ्या सासनकाठी पदयात्री आणि बैलजोड्यांसाठी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टने विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठी, नार्वेकर गल्लीतील जोतिर्लिंग मंदिर आणि कोंडुसकोप येथील सासनकाठ्या बैलगाड्यांसह कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. ट्रस्टने प्रवासादरम्यान बैलांचे आरोग्य टिकवण्यासाठी पौष्टिक आहार दिला, तर पदयात्री भाविकांसाठी आवश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

पदयात्रेच्या पहिल्या मुक्कामावर महाप्रसादाची व्यवस्था केली गेली, तसेच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्कामस्थळी भेट देऊन सासनकाठ्यांचे विधीवत पूजन केले आणि सामूहिक महाआरती संपन्न झाली.

या धार्मिक कार्यक्रमात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजित चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुलकर, राजू भातकांडे, तानाजी मुतकेकर यांच्यासह अभय लगाडे, जोतिबा कावळे आणि इतर विश्वस्त तसेच महिला सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.