- दुर्गामाता दौडीचा सातवा दिवस
- आनंदवाडीत पारंपरिक वेशभूषेतील बालचमू ठरले आकर्षण
बेळगाव / प्रतिनिधी
शहापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचा सातवा दिवस देवी कालरात्रीच्या पूजेसह उत्साहात साजरा झाला. विशेषतः आनंदवाडी परिसरातील पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे मन वेधून घेतले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सातव्या दिवसाची सुरुवात श्री अंबाबाई देवस्थान (नाथ पै चौक, शहापूर) येथून करण्यात आली. प्रारंभी श्री अंबाबाईची आरती करून प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून दौडीला चालना देण्यात आली.
यानंतर दौड नाथ पै सर्कल, लक्ष्मी रोड, कारवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डब्बल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, विठ्ठलदेव मंदिर, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमल बोळ, म. फुले रोड, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली अशा नियोजित मार्गाने पुढे मार्गस्थ झाली. मार्गावरील विविध ठिकाणी पुष्पवृष्टी व औक्षण करून दौडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
शहापूर नार्वेकर गल्ली येथील बालशिवाजी मित्र मंडळाने बलात्काऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणारा देखावा सादर केला. हिंदवी स्वराज्याच्या काळातील अन्याय आणि त्या वेळी बलात्काऱ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेबद्दलही या देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या दौडीतून तरुणांमध्ये देव, देश आणि धर्मरक्षणाची जाणीव जागृत व्हावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य व छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान यांची आठवण राहावी, हा या दौडीचा मुख्य उद्देश आहे.
आचार्य गल्लीतील युवागटाने पवनखिंडीचा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करून दाखवला. त्यातून समाजातील एकात्मतेचा संदेश देण्यात आला. महिलांनी पारंपरिक पोशाखातून हिंदू संस्कृतीचे वैभव साकारले, तर आनंदवाडीतील पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बालचमूंनी दौडीला वेगळेच आकर्षण प्राप्त करून दिले.

शेवटी मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, कोरे गल्ली मार्गे गोवावेस येथील जगज्योती बसवेश्वर सर्कल दौडीची सांगता झाली.
दरम्यान, सोमवार २९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी उद्यानातून दौडीला प्रारंभ होऊन एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाण पूल, स्टेशन रोड, हेमूकलानी चौक, रामलिंगखिंड गल्ली मार्गे जत्तीमठ येथील दुर्गामाता मंदिरात सांगता होणार आहे.