• पाच जणांना अटक

बेळगाव / प्रतिनिधी

गणेशपूरच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका आडवाटेवर सुरू असलेल्या अंदर-बाहर प्रकारच्या जुगार खेळावर कॅम्प पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 7,200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमित गुलाब बेपारी (31, काकर स्ट्रीट, कॅम्प), धरम बिक्कू लांबे (38, ज्योतीनगर, गणेशपूर), प्रकाश संभाजी पाटील (42, सरस्वतीनगर), राजू अर्जुन देसुरकर (34, समर्थनगर) आणि अरिकराजू सॅबॅस्टीन फ्रान्सिस (33, लक्ष्मीनगर, हिंडलगा) यांचा समावेश आहे.

जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय रुक्मिणी यांच्या नेतृत्वातील पथकाने स्थळी धाड घातली. सर्व आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.