- सहा जणांना अटक : हेरॉईनसह रोकड आणि मोबाईल जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांदरम्यान मोठ्या प्रमाणात हेरॉईन, मोबाईल फोन आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
१९ ऑक्टोबर २०२५ रोजी पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंबा भवन हॉटेलच्या मागील भागात कारवाई केली. येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विक्री करताना दोन संशयितांना रंगेहात पकडण्यात आले. अप्पर मुन्ना धारवाडकर (वय २६ रा. उज्वल नगर, बेळगाव) सम खलील हुबळी (वय २६ रा. छत्रपती शिवाजीनगर, बेळगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून २०.२६ ग्रॅम हेरॉईन (किंमत सुमारे ₹३७,२००), ₹२,००० किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि ₹१,०७० रोकड असा एकूण ₹४०,२७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी हे हेरॉईन मुंबईतील सायन-कोळवाडा परिसरात राहणाऱ्या ‘अम्मा उर्फ राणी एम’ नावाच्या महिलेकडून घेतल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत, पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने हाजीपीर रस्त्यावर छापा टाकला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी ‘अंदर-बाहर’ पत्त्यांचा जुगार खेळताना चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. मंगेश बाबू दवळे, राम देवनाथ लाखे , युवराज सुंदर लाखे (तिघेही रा. छत्रपती शिवाजीनगर बेळगाव) , अजय अर्जुन लाखे, (रा.ज्योतीनगर, गणेशपूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी या ठिकाणावरून ₹१,६८० रोकड रक्कम व जुगाराचे पत्ते जप्त केले असून, आरोपींविरुद्ध जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.