• नुकसानभरपाईची मागणी

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील गणेबैल – काटगाळी रस्त्याजवळील जंगल परिसरात गवी रेड्याने शेतकऱ्याच्या बैलावर हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात बैलाचा जबडा फाटून तुटला आहे. त्यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

हा बैल गणेबैल येथील शेतकरी देवाप्पा राघोबा गुरव यांच्या मालकीचा आहे. पशुसंवर्धन खात्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली; मात्र जबड्याची झालेली गंभीर जखम लक्षात घेऊन उपचार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चारा – पाण्याचे सेवन होऊ न शकल्याने बैलाचे आयुष्य धोक्यात आले आहे.

या घटनेनंतर नेगील योगी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर सुळेभावीकर यांनी भेट देऊन शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली. तसेच, अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मानवी दृष्टिकोनातून किमान प्रथमोपचार तरी सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नारायण कोलेकर, मारुती गुरव, रमेश कवठणकर, ज्ञानेश्वर गेजपतकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.