- २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती
पुणे : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला आहे. रविवारी ३.३० वा. सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले.
पूल कोसळल्याने अनेक पर्यटक नदीमध्ये बुडाले असून २० ते २५ जण वाहून गेले आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला आहे.