• बालकवींच्या काव्यरसाने रंगली अविस्मरणीय काव्यसंध्या

बेळगाव / प्रतिनिधी

“हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे…”, “आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे…” अशा बहारदार ओळींनी बुक लव्हर्स क्लबच्या साप्ताहिक कार्यक्रमात काव्यरसिकांना मंत्रमुग्ध केले. लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या या विशेष उपक्रमात सौ. सुनीता पाटणकर व डॉ. रश्मी फडके यांनी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांवर आधारित सुरेख कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. सौ. आश्विनी वैद्य यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा परिचय करून दिला.

सौ. सुनीता पाटणकर व डॉ. रश्मी फडके यांनी बालकवींच्या निवडक कवितांचे सस्वर सादरीकरण करत त्यांच्या काव्यवैभवाचा वेध घेतला. त्यांनी सांगितले की, अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या अल्प आयुष्यात बालकवींनी विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या कवितांतून शब्दांवरील प्रभुत्व, निसर्गप्रेम, बालसुलभ भावविश्व आणि कोमल संवेदना प्रकर्षाने जाणवतात. अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेली काव्यसंपदा ही वात्सल्य आणि प्रेमाचा अखंड स्रोत ठरली.

‘औदुंबर’सारख्या रचनांमधून आध्यात्मिक स्पर्श जाणवतो, तर ‘संध्यारजनी’, ‘फुलराणी’, ‘तारकांचे गाणे’ यांसारख्या कवितांनी श्रोत्यांची मनोभावे दाद मिळवली. बालकवींच्या प्रतिभेचे कौतुक त्या काळातील नामवंत व्यक्तींनीही केले होते, असे वक्त्यांनी नमूद केले.

संपूर्ण कार्यक्रमात काव्य, स्वर आणि भावनांचा संगम अनुभवताना साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्यरसिकांसाठी ही संध्या संस्मरणीय ठरली.