बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलमधील शिकणाऱ्या गरजू , होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप व रक्षाबंधन असा संयुक्तिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस.एम.जाधव उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील यांनी शाळेच्या ४० वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेऊन,संस्था यशस्वी वाटचाल करीत आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संस्था सचिव ए. एल. निलजकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन, स्वागत केले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून, उपस्थित अतिथींना राखी बांधून औक्षण केले.पवित्र,धार्मिक व भावनिक असा हा कार्यक्रम यावेळी पार पडला. यावेळी वाय.पी.नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, अभ्यासाबरोबरच विविध छंद जोपासावे जिद्द , चिकाटी, कौशल्य या गुणांनी गाव व शाळेचा नावलौकिक वाढवावा. भाऊ – बहिणीच्या दृढ नात्याचा हा सण आज साजरा केला जातो , हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व सुभेदार मेजर सुधाकर चाळके यांनीही मौलिक विचार व्यक्त करून, शाळेच्या भौतिक प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू,असे आश्वासन दिले. शाळेची गुणवंत खेळाडू प्रियांका शिवाजी तारीहाळकर हिचाही महात्मा गांधी संस्थेकडून रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाला एस.एम.जाधव, यल्लापा बेळगावकर,अशोक कांबळे,मनोहर पाटील, के. आर. भास्कर, पुंडलिक जाधव, संतोष कांबळे, निंगाप्पा जाधव,अब्दुल नावगेकर, नारायण कांबळे,प्रभाकर जाधव, माजी उपाध्यक्ष मनोहर बेळगावकर , बबन जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना योगेश अर्जुन निलजकर यांनी दिलेल्या सायकलींचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी केले. तर आभार क्रीडा शिक्षक अरूण दरेकर यांनी मानले. यावेळी गावातील शिक्षणप्रेमी पालक, आजी – माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.