खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील बैलूर गावातील एका शेतकऱ्याच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारून फस्त केल्याची घटना बुधवार दि. १६ जुलै रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की बैलूर येथील शेतकरी नारायण कृष्णा कणकुंबकर हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांचा मुलगा पुंडलिक नारायण कणकुंबकर गुरे चारण्यासाठी ‘निमुन’ नावाच्या शेताकडे जात होते. या शेताकडे जाण्यासाठी जंगलातून रस्ता आहे. त्यामुळे निमुन शेताकडे जायचे असल्यास जंगलातील रस्त्यानेच जावे लागते. त्यामुळे पुंडलिक नारायण कणकुंबकर व गावातील आणखी एक शेतकरी मारुती विठोबा तोराळकर हे आपली गुरे चारवण्यासाठी जंगलातील वाटेने जात असताना बिबट्याने सदर कुत्र्यावर हल्ला करून त्याला फरपटत नेले व त्याला मारून फस्त केले. दैव बलवत्तर म्हणून सदर दोन्ही शेतकऱ्यांना काही झाले नाही, अन्यथा त्यांच्या जीवावर बेतले असते. मात्र या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला आहे. मागील वर्षी पावसाळ्यामध्येच, नारायण कृष्णा कणकुंबकर हे याच मार्गाने गुरे चारविण्यासाठी जात असताना एका बिबट्याने याच कुत्र्यावर हल्ला केला होता. परंतु नारायण यांनी आरडाओरडा करून या बिबट्याला हुसकावून लावले होते, त्यामुळे या कुत्र्याचा प्राण वाचला होता परंतु बरोबर एक वर्षांनंतर पुन्हा तीच घटना घडली व कुत्र्याचा बळी गेला आहे.