- खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रतिपादन
- बी. के. मॉडेल हायस्कूल शतक महोत्सव
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन जितके महत्त्वाचे आहे, तितकीच पालकांची भूमिका निर्णायक ठरते. मुलांवर अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांना स्वतःच्या आवडी-निवडींनुसार आयुष्याची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.
कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. गुरुराज करजगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खासदार शेट्टर पुढे म्हणाले की, बी. के. मॉडेल हायस्कूलने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता सामाजिक जाणीव, संस्कृती आणि परंपरेची मूल्ये रुजवली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यामुळेच या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहेत. शिक्षकांबरोबरच पालकांनीही मुलांच्या मतांचा आणि आवडीचा आदर करावा. आपली मते मुलांवर लादू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक व पालकांनी मिळून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. गुरुराज करजगी म्हणाले की, आजची पिढी मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या निर्जीव साधनांमध्ये अधिक गुंतत चालली आहे. यामुळे मानवी नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. शिक्षण केवळ गुणांपुरते मर्यादित राहू नये. शिक्षकांनी नोकरी म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अध्यापन करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या मुलांसारखे पाहावे आणि पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद साधावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीनिवास शिवणगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी बी. के. मॉडेल हायस्कूल, श्रीधर कुलकर्णी उषाताई गुप्ते हायस्कूल तसेच प्रभाकर शहापूरकर यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.







