• प्रा. निलेश शिंदे यांचे प्रतिपादन
  • पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विशेष व्याख्यानमाला उत्साहात

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी साहित्य हे केवळ भाषेचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक घडामोडींचा सखोल वेध मराठी साहित्य घेत असल्याने विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, संवेदनशीलता आणि तर्कबुद्धीच्या विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. निलेश शिंदे यांनी केले.

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत ‘मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि आजच्या काळातील आपली जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते. २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रा. शिंदे यांनी मराठी भाषेचा इतिहास, भक्ती चळवळीपासून ते शिवकालीन प्रशासनातील वापर, तसेच आधुनिक काळातील सामाजिक सुधारणांमधील योगदान यांचा आढावा घेतला. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंग-ओवींमधून मराठीला लोकभाषेचा दर्जा मिळाला, तर पुढील काळात पत्रकारिता, शिक्षण व साहित्य चळवळीमुळे भाषा अधिक समृद्ध झाली, असे त्यांनी सांगितले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास बौद्धिक विकास अधिक परिणामकारक होतो, यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या ममता पवार होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थी प्रा. लता कणबरकर यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत डिजिटल युगात भाषेची उपस्थिती मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. धनश्री पाटील-कंग्राळकर यांनी मराठी ही आपल्या संस्कृती व अस्मितेची ओळख असल्याचे नमूद करत तिच्या जतन-संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. धनश्री गाडे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. विजया डिचोलकर यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रेणुका चलवेटकर यांनी केले. या व्याख्यानमालेस प्राध्यापक, माजी विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.