नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी मोठी भेट देत भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली आहे. रात्रीच्या प्रवासासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलेली ही ट्रेन प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक असे आखण्यात येणार आहे की, ती संध्याकाळी मूळ स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा सकाळी गंतव्यस्थानी पोहोचेल. त्यामुळे दीर्घ पल्ल्याचा रात्रीचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
या ट्रेनमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना प्रवासादरम्यान स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. गुवाहाटीहून धावणाऱ्या ट्रेनमध्ये अस्सल आसामी पदार्थ, तर कोलकाताहून सुरू होणाऱ्या सेवेत पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे प्रवास केवळ आरामदायीच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध ठरणार आहे.
- वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्ये :
- ताशी १८० किमी वेगासाठी डिझाइन केलेली सेमी-हाय-स्पीड ट्रेन
- अधिक आरामासाठी सुधारित कुशनिंगसह एर्गोनॉमिक बर्थ
- वेस्टिब्यूलसह स्वयंचलित दरवाजे, सुलभ हालचालीसाठी सोय
- उत्कृष्ट सस्पेंशन आणि आवाज कमी करणारे आधुनिक तंत्रज्ञान
- ‘कवच’ सुरक्षा प्रणालीने सुसज्ज
- उच्च स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- प्रगत नियंत्रण व सुरक्षा प्रणालीसह ड्रायव्हर केबिन
- एरोडायनॅमिक रचना आणि स्वयंचलित बाह्य प्रवासी दरवाजे
- दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
- आपत्कालीन प्रसंगी संवादासाठी टॉक-बॅक युनिट
- सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
- सुधारित अग्निसुरक्षा प्रणाली, इलेक्ट्रिकल कॅबिनेट व शौचालयांमध्ये आग शोध व दमन यंत्रणा
वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे भारतीय रेल्वेच्या रात्रीच्या प्रवासाला नवे परिमाण मिळणार असून, प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.









