बेळगुंदी ता. ३१ : बेळगुंदी येथे उद्या रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी, २० वे मराठी साहित्य संमेलन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी मरगाई देवस्थान परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी, अनुवादकार, समीक्षक, साहित्यिक, पुणे या असणार आहेत. संमेलन चार सत्रात सकाळी ७.३० ते रात्री ६ वा.पर्यंत होणार आहे.

संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री. मोहन यल्लाप्पा मोरे माजी अध्यक्ष आरोग्य शिक्षण व स्थायी समिती जि. पं. बेळगाव यांच्याहस्ते होणार आहे, त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉ. अरुण मारुती जाधव – प्राचार्य, आधार एज्युकेशन सोसायटी, बेळगांव उपस्थितांचे स्वागत करणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे.

दुसऱ्या सत्रात प्रा. वैजनाथ महाजन, जेष्ठ समिक्षक सांगली यांच्या अध्यक्षतेखाली ‘वाचू आनंदे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये मा. श्री. चिंतामणी सहस्त्रबुद्धे, न्यूज ब्युरोचीप, सांगली, मा. शेखर जोशी, सहयोगी संपादक दै. सकाळ सांगली, मा. प्रा. संजय ठिगळे, माजी सदस्य मराठी विश्वकोश मंडळ, सांगली यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी १.३० ते २.३० पर्यंत स्नेहभोजन होणार आहे. तिसऱ्या सत्रात मालगांव मिरज, येथील जि. पं. शाळेचे मुख्याध्यापक कवी श्री. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यामध्ये कवी श्री. मुबारक उमराणी, कवी सेंट ऑगस्टीन हायस्कूल, नेरुळ, नवी मुंबई व स्थानिक निवडक नवोदित कवी सहभागी होणार आहेत.

चौथ्या सत्रात कथाकथनकार श्री. शरद जाधव, धनगांव, पलुस – सांगली यांचे कथाकथन होणार आहे. यानंतर बेळगुंदी पंचक्रोशीतील सन २०२४ – २५ साली इयत्ता १० मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलन नगरीला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे, तर प्रवेशद्वाराला श्री रवळनाथ प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी, ग्रामस्थ पंच कमिटी, ग्रामपंचायत, महिला मंडळे, आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा, बालवीर विद्यानिकेतन, सेंट पॉल्स हायस्कूल, बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी, कन्या विद्यालय बेळगुंदी शिक्षकवृंद, विद्यार्थी – विद्यार्थीनी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, सेवाभावी संस्था, सर्व प्रसारमाध्यमे, हितचिंतक बेळगुंदी, ता. बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.