• माजी आमदार संजय पाटील यांचा गंभीर आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाला राजकीय संरक्षण मिळत असल्याने पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा गंभीर आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला आहे.

बेळगुंदी येथील शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात विद्यार्थिनीने लैंगिक छळाची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, तक्रार स्पष्ट असूनही पुढील कायदेशीर कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात शनिवारी बेळगाव येथे बोलताना संजय पाटील म्हणाले की, “हा प्रकार सिद्ध होत असतानाही आरोपीवर कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. एका प्रभावी मंत्र्याचा हस्तक्षेप असल्यामुळेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

ते पुढे म्हणाले, “राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या मतदारसंघातच ही घटना घडली आहे. त्यामुळे सरकारने राजकारण बाजूला ठेवून पीडित विद्यार्थिनीला तातडीने न्याय द्यावा.”

“हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि समाजाला काळीमा फासणारा आहे. आमचाही या प्रकरणात राजकीय फायदा घेण्याचा कोणताही हेतू नाही. विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या आरोपीवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी संजय पाटील यांनी केली.

या प्रकरणात सरकार व संबंधित विभागांनी त्वरित हस्तक्षेप करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.