• महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यव्यापी विशेष मोहिमेला गती

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ‘अक्का पथक’ या विशेष मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते राणी चन्नम्मा चौक येथे या उपक्रमाची अधिकृत सुरुवात झाली. महिलांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ही मोहीम राज्यभर प्रभावीपणे कार्यान्वित होणार आहे.

महिला व बालविकास विभाग आणि गृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेले हे पथक कर्नाटकातील ३१ जिल्ह्यांसह पाच पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहे. शाळा, महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त घालून महिलांवरील संभाव्य अत्याचारांना आळा घालण्याचा यामागील उद्देश आहे. कार्यक्रमास पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की, “महिला रात्री १२ वाजताही निर्भयपणे फिरू शकतील, तेव्हाच देशाला खरे स्वातंत्र्य लाभले असे म्हणता येईल.” महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी १८१ आणि १०९८ हे हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले असून, संकटसमयी संपर्क साधल्यास अवघ्या दोन मिनिटांत ‘अक्का पथक’ मदतीसाठी दाखल होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यभरातून या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी अर्थसंकल्पात या पथकाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.