• एचईएसटी परीक्षेत राज्यात प्रथम, देशात पाचवा क्रमांक
  • टोरोंटो विद्यापीठात निवड

मच्छे : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील कु. तृप्ती मल्लाप्पा देसाई हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘एचईएसटी’ (Higher Education Scholarship Test) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत बेळगावचा मान उंचावला आहे. तिने कर्नाटकात प्रथम, देशात पाचवा आणि जागतिक स्तरावर २१ वा क्रमांक पटकावला आहे.३५ लाख विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पडलेल्या या परीक्षेत तृप्तीने मिळवलेले यश विशेष मानले जात आहे. मागील १५ वर्षांनंतर कर्नाटकातील मुलींमध्ये हा मान पटकावणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. दोन महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या ‘सेट’ परीक्षेतही तिने राज्यात प्रथम आणि देशात पाचवा क्रमांक मिळवला होता.

कु. तृप्ती ही मराठी केंद्र शाळा मच्छेची माजी विद्यार्थिनी आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. एचईएसटी ही परीक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व विश्लेषण कौशल्य तपासण्यासाठी घेतली जाते. जगभरातील ४० हजारांहून अधिक महाविद्यालये व विद्यापीठे या परीक्षेच्या गुणांना प्रवेशासाठी मान्यता देतात. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तृप्तीची कॅनडातील नामांकित टोरोंटो विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेले हे विद्यापीठ कॅनडातील अव्वल शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.

तृप्तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.