बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नवी नोंद होत असून श्रीधर माळगी, सिमरन गौंडाळकर आणि स्वतीक पाटील हे तीन होतकरू दिव्यांग जलतरणपटू येत्या 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियातील Gold Coast Aquatic Centre येथे होणाऱ्या पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज-2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे सदस्य असलेले हे तिघे लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असून शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
२५ वर्षीय श्रीधर माळगी हा आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतून पुढे आलेला जिद्दी जलतरणपटू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १३ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर ७ सुवर्ण, १२ रौप्य आणि ७ कांस्य अशी २६ आंतरराष्ट्रीय पदके तसेच ४७ सुवर्ण, ९ रौप्य व १ कांस्य अशी ५७ राष्ट्रीय पदके आहेत. अलीकडेच त्याला कर्नाटक सरकारचा सर्वोच्च क्रीडा सन्मान एकलव्य पुरस्कार बहाल झाला आहे.
सिमरन गौंडाळकर ही समर्पित आणि प्रतिभावान पॅरा जलतरणपटू असून तिने सातत्यपूर्ण कामगिरी करत १ सुवर्ण व २ रौप्य अशी ३ आंतरराष्ट्रीय आणि ३० सुवर्ण व २ रौप्य अशी ३२ राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. स्वतीक पाटील याने देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत ३३ सुवर्ण, ७ रौप्य व २ कांस्य अशी ४२ राष्ट्रीय पदके आपल्या नावावर जमा केली आहेत.
या तिघांची भारतीय संघात निवड झाल्यानंतर बेळगावातील क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण आहे. ते सर्व बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिंपिक आकार) येथे जलतरण गुरु उमेश कलघटगी तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी तीन तास कडवा सराव करतात.
या खेळाडूंना केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, पॉलिहायड्रॉन फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चिटणीस, अलायड फाऊंडर्स बेळगावचे सीएमडी राम मल्ल्या, एसएलके ग्रुप बंगलोर, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, मानेक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आदींचे पाठबळ लाभत आहे. भारतीय संघात निवड झाल्याने आता या तिघांकडून जागतिक स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







