• एकाला अटक ; माळमारुती पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील महांतेशनगर येथून २ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरीला गेलेल्या क्रेटा कारच्या तपासात यश आले असून अखेर माळमारुती पोलिसांनी सदर कार जप्त केली आहे.

पोलिस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.चोरीचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एक विशेष पथक नेमून ते हैदराबादला पाठवण्यात आले. या पथकाने हैदराबादमधील हयातनगर परिसरात शोधमोहीम राबवली आणि अखेर चोरीला गेलेली क्रेटा कार शोधण्यात यश मिळवले.

या कारवाईत पोलिसांनी आंध्र प्रदेशातील चित्तीबाबू उर्फ वीर दुर्गाप्रसाद (वय ४७) याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून कार जप्त करण्यात आली आहे. तपासादरम्यान असेही समोर आले की, आरोपीसोबत संगम चक्रधर नावाचा त्याचा साथीदारही बेळगावला आला होता आणि दोघांनी मिळून ही चोरी केली होती.

सध्या संगम चक्रधर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले असून, लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.