• संतोष सत्यनायक, राघवेंद्र हवालदार आणि बाहुबली अनगळे यांची निवड

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील काही कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि व्यावसायिकतेसाठी २०२५ साली प्रतिष्ठित ‘मुख्यमंत्री पदक’ देण्यात आले. हा सन्मान त्या अधिकाऱ्यांना दिला जातो ज्यांनी दीर्घकाळ सेवेत राहून गुन्हेगारीवर प्रभावी कारवाई केली, कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली आणि तांत्रिक कौशल्याचा दाखला दिला.

शहरातील मार्केट उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांची यावेळी पदकासाठी निवड झाली. त्यांनी १९९९ मध्ये पीएसआय म्हणून सेवा सुरू केली आणि गेल्या २७ वर्षांपासून निष्ठापूर्वक काम करत आहेत. गणेशोत्सव, राज्योत्सव आणि हिवाळी अधिवेशनात संभाव्य घटनांवर नियंत्रण ठेवण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच, ४७ लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याचे दागिने जप्त करण्यात त्यांच्या मार्गदर्शनामुळे यश आले.

त्याचबरोबर फिंगरप्रिंट युनिटचे हेड कॉन्स्टेबल बाहुबली ए. अनगळे यांनाही मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी १,००० हून अधिक गुन्हे घटलेल्या ठिकाणी भेट देऊन NAFIS सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ११८ हून अधिक आंतरराज्यीय आरोपींची ओळख पटवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे ५ कोटी रुपयांची चोरीची मालमत्ता परत मिळवण्यात यश मिळाले. विशेषतः, एका मतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळवण्यासाठी त्यांनी गोळा केलेले वैज्ञानिक पुरावे निर्णायक ठरले.

याचबरोबर डीएसपी राघवेंद्र हवालदार यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले.