बेळगाव / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने २८ वी श्रीकृष्ण रथयात्रा दि. २४ व २५ जानेवारी रोजी बेळगावनगरीत होत आहे.या रथयात्रेनिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच इस्कॉनच्या श्री श्री राधागोकुळानंद मंदिरासमोर करण्यात आली. ज्येष्ठ भक्त नारायण गौरांगदास यांच्या हस्ते ही मुहूर्तमेढ झाली. ‘बेळगावकरांचा उत्सव’ म्हणून मान्यता पावलेल्या या रथयात्रेत देशाच्या विविध भागातून हजारो भाविक आणि इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ संन्यासी सहभागी होणार आहेत. या रथयात्रेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ रोजी रथयात्रा झाल्यानंतर त्या दिवशी व दि. २५ रोजी मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या शामियान्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या मुहूर्तमेढप्रसंगी चैतन्य प्रभू, प्रेमरस प्रभू, अमृतकृष्ण प्रभू, रामदास, सुकुमार प्रभू, श्री रामायण प्रभू, संकर्षण प्रभू आदी उपस्थित होते.