बेळगाव / प्रतिनिधी

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी बेळगावात साने गुरुजी कथामालेचे ५८ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदाचे वर्ष कथामालेच्या स्थापनेचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे अधिवेशन टिळकवाडी येथील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात (प्रा. एन. डी. पाटीलनगर) सकाळी १०:१० वाजता सुरू होणार असून, अ. भा. साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष हसन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडेल. अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सरोज एन. पाटील (माई) यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्यास डॉ. गणेश देवी, आकाश शंकर चौगुले, डॉ. आनंद मेणसे, प्रा. शामराव पाटील, डॉ. सीमा परदेशी आणि लालासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२:३० वाजता ‘साने गुरुजी विचारधारा’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार, तसेच दुपारी ३:३० वाजता खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप होईल.

मुख्य अधिवेशनापूर्वी शनिवार, १० जानेवारी रोजी कार्यकारी मंडळ, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विश्वस्त सभा होणार आहेत. या ऐतिहासिक अधिवेशनास महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.