बेळगाव / प्रतिनिधी
सकल मराठा समाज बेळगावतर्फे सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे मराठा समाजातील सर्व घटकांसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
लवकरच कर्नाटक राज्यात होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आपली नोंद नेमक्या पद्धतीने कशी करावी याबाबत या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बेळगाव आणि परिसरातील मराठा समाजाने जनगणनेत आपले नाव कोणत्या रकान्यात नोंदवावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येणार आहेत.
याशिवाय समाजातील तरुण पिढीच्या हितासाठी जनजागृती करणे किती गरजेचे आहे, यावरही या बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे मराठा समाजातील सर्व बांधवांनी या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने प्रकाश मरगाळे, किरण जाधव आणि नागेश देसाई यांनी केले आहे.