• नियमभंगावर कारवाई ; लाऊडस्पीकर वापरास मर्यादा 
  • पोलीस आयुक्तांचा इशारा

बेळगाव / प्रतिनिधी

होळी आणि रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी कडक सतर्कतेचा इशारा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२ मार्च रोजी शहर हद्दीत ३२९ ठिकाणी होलिका दहन, तर ३ मार्च रोजी सुमारे १८० ठिकाणी रंगपंचमी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची व्यापक तयारी करण्यात आली असून, १००० हून अधिक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. शहरातील १९ मोक्याच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर तसेच चाकूसारखी घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या सुरू असलेल्या पीयूसीसह विविध परीक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून लाऊडस्पीकरच्या वापरावर मर्यादा घालण्यात आली आहे. आवाजाची पातळी ७५ डेसिबलपेक्षा अधिक आढळल्यास संबंधित उपकरणे जप्त करण्यात येतील, असा इशाराही आयुक्तांनी दिला.

उत्सवावर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, ८ ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. नागरिकांनी केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करावा, कोणावरही जबरदस्तीने रंग लावू नये आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस विभागाने नागरिकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.