• ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ची स्थापना; ४१ गुन्हे नोंद, ६० जणांवर कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

शहरात वाढत्या चाकूहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. चाकू, सुऱ्या व इतर घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत शहरात चाकूहल्ल्याचे ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ स्थापन करण्यात आले असून ६० हून अधिक जणांवर आर्म्स अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

विशेषतः मार्केट व खडेबाजार परिसरात अशा घटना वाढल्याने त्या भागात रात्रंदिवस गस्त, वाहन तपासणी आणि आकस्मिक धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार किंवा पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून अशा गुंडांविरुद्ध रौडीशिट उघडण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून बॅगेत चाकू-सुऱ्यांसारखी शस्त्रे आढळून येत असल्याने पोलीस प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. किरकोळ वादातून तरुणांकडून हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी दररोज तपासणी केली जात आहे.

अलीकडेच माळमारुती पोलिसांनी पिस्तूल व शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडून संभाव्य अनर्थ टाळला. शहरात शस्त्र संस्कृतीला आळा घालण्यासाठी पोलिसांची करडी नजर असून पालकांनीही मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे, असे आवाहन आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.